आज सकाळी पेपरला “एका लग्नाची पुढची गोष्ट” या नाटकाची जाहिरात बघितली. पोरांना शाळेला सुट्टी पण होती, त्यामुळे आज हे नाटक बघायचा योग जुळून आला होता. बुक माय शो वर चेक केलं तर तिकीट उपलब्ध नव्हतं. एक चान्स घ्यावा म्हणून, प्रशांत दामले सरांना मेसेज केला. काही मिनिटांतच सरांचा मेसेज आला, “चेक करतो…कन्फर्म आहे, होतील 2 तिकिटं ऍडजस्ट.
मग काय आम्ही आवरा आवर करून; वेळेत, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूडला पोहोचलो. आतापर्यंत फोन मेसेजवरच, प्रशांत सरांशी बोलणं झालं होतं, आज प्रथमच प्रत्यक्ष भेट होणार होती. त्यांना नम्रताने केलेलं पेंटिंग भेट द्यायला घेतलं.
वेळेत नाटकाला पोहोचलो, तिकिटं ताब्यात आली. स्टेज समोर, दुसऱ्या रांगेत मध्यभागी मिळालेली तिकिटं.. इतक्या जवळून पहिल्यांदाच नाटक बघायला मिळणार होते.
काय नाटक आहे म्हणून सांगू….हे नुसतं नाटक नाही तर रंगीबेरंगी जगण्याचा मजेदार प्रवास आहे. सगळ्याच कलाकारांचे दर्जेदार काम..नाटकभर आपल्याला खिळवून ठेवतं.
प्रशांत सरांचे टायमिंग, एनर्जी, गायन…सगळंच अफलातून. कौतुक तरी कशा कशाच करावं. अख्खं नाटक डोळ्यात पाणी होतं..कधी हसून तरी कधी इमोशनल होऊन.
नाटकातील नायकाचे नाव मन्या, त्याचा व्यवसाय पर्यटन…त्यामुळे अख्खं नाटक मन्या, मन्या…आणि मन्याच होतं. गंमत म्हणजे दामले सरांच्या काही लकबी, माझ्या सवयींसारख्याच होत्या, त्यामुळे नम्रताला मीच वाटायचो.
नाटक संपलं, प्रशांत सरांना भेटलो, त्यांनीही मानाने बोलावलं, त्यांना कामाची मनमुराद दाद दिली. त्यांनीही आपुलकीने चौकशी केली. मी त्यांना पराशर वर येण्याचे निमंत्रण दिले.
त्यांचा पुढचा प्रयोग बालगंधर्व होता, त्यामुळे लगेच पुढे निघते झाले. आज बऱ्याच दिवसांनी नाटक बघायला मिळाले..सरांची ऊर्जा प्रेरणा देऊन गेली. चालतानाही गाणं गुणगुणत होते.
आपलं काम कसं एन्जॉय करायचं अशा, प्रेमळ कामसू लोकांच्या यादीत सरांचीही अनुभूती जमेला आली.
मनोज हाडवळे
9970515438


