एक चांगली यंत्रणा; गरज, मुल्य आणि त्यासाठीची मोजलेली अथवा ठरवलेली किंमत यावर अवलंबून असते.
नीट च्या पेपरफुटीच्या बातम्या आल्यापासून, कित्येकदा माझ्या नजरेसमोर, दिवसाची रात्र करून अभ्यास करणारे विद्यार्थी आणि जवळचं विकवाक करून, आपल्या पोरापोरींना डॉक्टर करावे म्हणून सर्वस्व पणाला लावलेले पालक येऊन गेले.
त्याची चूक हीच होती की त्यांनी, प्रामाणिक प्रयत्न केले..आणि अजून घोडचूक म्हणजे, त्यांनी यंत्रणेवर विश्वास ठेवला.
एखाद्या शिक्षकाला दोन पैसे अधिकचे मिळावेत म्हणून लोभ सुटतो आणि ते प्रश्न “लीक” करतात.
एखाद्या कोचिंग क्लासेसच्या मालकाला, आपल्या क्लासचा निकाल चांगला लागावा, अजून पैसे मिळावेत म्हणून ते पेपर “लीक” करतात.
एखाद्या पालकाला वाटतं, माझा मुलगा/मुलगी पास होईल की नाही? दमछाक करणारी स्पर्धा आहे, त्यात टिकेल की नाही? नाहीच पास झाला तर समाजात छी थू होईल. कुठं काही सेटिंग लागतेय का म्हणुन त्यांनी प्रयत्न करून, निकाल “लीक” होतो.
आणि सगळ्याच थरातून उत्तेजना मिळतेय, जे हवं ते मेहनतीने मिळविण्यापेक्षा, शक्य ते विकत घेऊन, बाकी ओरबाडून घेऊन, आपल्या पदरात पाडून घ्यायचे म्हणून, प्रत्येक घटक, आपापल्या थरावर यंत्रणा “लीक” करतो.
एकदा हे लिकेज सापडले गेले की युद्धासारखे, पहिल्या फळीतले सैनिक मारले जातात किंवा पकडले जातात. मुख्य सेनापती, वजीर आणि राजापर्यंत पोहोच जात नाही.
ही लोकं काही दिवस शांत बसून, पुन्हा कोणीतरी नवीन यंत्रणा आणि त्यातल्या लिकेज मधील व्यावसायिक संधी असलेलं छान प्रपोजल घेऊन येतो, तेव्हा पुन्हा ऍक्टिव्ह होतात.
अर्थात, आपल्यापर्यंत संधी पोहोचली नाही म्हणून निषेध करत आहोत की, हे यंत्रणेतील लिकेज मान्य नाही म्हणून म्हणुन बोलत आहोत, याचे आत्मपरीक्षण ज्याचे त्याचे.
शिवाय नेहमीच्या जगण्यात “लिकेज” ची संधी येते किंवा असते, तेव्हा आपण कोणत्या बाजूने उभे असतो याचेही आत्मभान ज्याचे त्याचे.
मनोज हाडवळे


